श्री

क्षेत्र संस्थान नारायण गडावरील बांधकाम म्हणजे एक लहानसा डोंगरी किल्लाच म्हणावा लागेल. संपूर्ण बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे दगडी असून यात दरवाज्याशिवाय यात कोठेही लाकूड दिसणार नाही. त्याच प्रमाणे राहत्या वाड्याचा दरवाजा कमानीचा वाडा आणि इतर काही ठिकाणचे दगडी शिल्प पाहण्यासारखे प्रेक्षणीय आहे.

पूर्व पश्चिम भिंती ३२५ फुट लांबीच्या असून त्यास दक्षिणेकडे एक आणि उत्तरेकडे एक असे दोन बाजूस दोन दरवाजे आहेत. दक्षिणोत्तर भिंतीची लांबी २३० फुट असून या भिंतीला पूर्वेकडून एक मोठा दरवाजा आहे. तो पाहण्यासारखा आहे. त्यास हत्ती दरवाजा म्हणतात त्यातून वाहने आत सहज जाऊ येऊ शकतात.

आतील दगडी बांधकाम खालील प्रमाणे :- मुख्य मंदिर ४० खनाचे असून त्यावर अप्रतिम व प्रेक्षणीय अशी तीन शिखरे आहेत. मंदिराखाली तळमजला बांधलेला आहे. उत्तरेकडील बाजूस दक्षिणाभिमुख ९० खणाच्या ओवऱ्या आहेत तर दक्षिणेकडील बाजूस उत्तराभिमुख ६२ खण ओवऱ्या बांधलेल्या आहेत. पूर्वेकडील बाजूस पश्चिमाभिमुख ८८ खन ओवऱ्या असून मधोमध पूर्वेकडील बाजूस पूर्वाभिमुख हत्तीदरवाजा आहे. पश्चिमेकडील बाजूस पूर्वाभिमुख ७२ खणाच्या ओवऱ्या असून त्यावर ५२ खण माडी आहे. त्याप्रमाणे एकूण दगडी बांधकाम ४०४ खनाचे आहे. शिवाय कमानीचा वाडा आणि राहता वाडा यात दगडी तळ मजले आहेत ते वेगळेच.

सभामंडप आणि महाराजाचे निवासस्थान सिमेंट कॉक्रीटचे आहे. तर स्वयंपाक गृह चौदा खण लाकडी माळवद व चौदा चौदा पत्र्याच्या दोन खोल्या या प्रमाणे प्रेक्षणीय आणि विशाल दगडी बांधकाम आज पहावयास मिळंते.