बडोधाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या वंशात महादेव महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगांव तालुका कर्जत (जि. अहमदनगर) सीना नदीच्या काठी असलेले सितपुर हे गांव आहे. ते लहानपणापासूनच ईश्वर भक्त होते. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे कल्याण व्हावे यासाठी ते योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरूचा शोध करू लागले.sdaf

त्या काळी मराठवाड्यात ज्ञानदानासाठी प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाविषयी” बरीच माहिती त्यांनी ऐकली होती. म्हणून त्यांनी त्यावेळी गादीवर असलेले महंत श्री. नरसू महाराजांची त्यांनी भेट घेतली आणि महादेवास येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्याची विनंती केली, ती नरसू महाराजांनी मान्य केली.

गडावर आल्यावर नरसू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर तप्चार्या केली. त्यांच्या कठोर तपोबलाने अल्प काळातच त्यांना काही सिद्धी आपोआप विनासायास प्राप्त झाल्या होत्या ते फार कडक स्वभावाचे होते.

एकदा स्वयंभू महादेवाच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम चालू होते ते स्वतः वर चढून शिखराची पाहणी करीत होते त्याचं वेळी नरसू महाराजांनी महादेवास हाक मारली ती त्यांनी शिखरावरूनच ऐकली आणि जमिनीवर असल्याप्रमाणे ते धावतच निघाले त्याचा परिणाम ते वरून पडण्यात झाला तेव्हा कामावरील मजूर ” महाराज पडले महाराज पडले ” असे म्हणून मोठ्याने ओरडले. तो पर्यंत तर महादेव उठून गुरुजी पर्यंत धावत गेले व काय आज्ञा आहे हे विचारू लागले. शिखरावरून पडून देखील महादेवास थोडीसुध्दा ईजा झाली नाही कारण एकनिष्ठ आणि निस्सीम भक्ताचे रक्षण पांडुरंग त्यांच्या मागेपुढे राहून करीत असतात.

पुढे गाईंची संख्या खूपच वाढली संस्थानाकडे गाई चरण्यासाठी जमीन नव्हती. हे संस्थान त्या काळी हैद्राबादच्या निजाम सरकारच्या राज्यात होते. आपण निजाम सरकारकडे जाऊन गडाच्या भोवतालची पाडीत जमीन गाईसाठी मागावी असे वाटले त्यांनी आपला विचार गुरुवर्य नरसू महाराजांना सांगितला व हैद्राबादला जाण्याची आज्ञा ध्यावी अशी विनंती केली.

हैद्राबादला पोहचल्यावर महादेव महाराजांना दरवाज्यात पहारेकऱ्यांनी अडवले. एक शिपाई राजाची परवानगी घेण्यासाठी आत गेला निजाम सरकारने त्यांना भेटण्याचे नाकारले त्यामुळे महाराजही हट्टाला पेटले, व जोपर्यंत सरकार भेटत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही असे सांगून दरवाज्याच्या समोर धरणे धरून बसले व नामस्मरणात तल्लीन झाले. त्यांनी तीन दिवस दरवाजा सोडला नाही. त्यांनी पाण्याचा घोट देखील घेतला नाही. चौथ्या दिवसी जेव्हा शिपायाने महाराज बसून असल्याचे सांगितले तेव्हा निजामास राग आला त्याने महाराजांना कैद करून जेलमध्ये बंद करण्यास सांगितले शिपायांनी ताबोडतोब महाराजास धरले आणि जेलबंद केले व निघून गेले. परंतु आपल्या तपोबलाने महाराज क्षणाचाही विलंब न लागता मुक्त झाले. व शिपायाच्या अगोदर येउन दरवाज्यात येउन उभे राहिले. असे सात वेळा झाले तेव्हा निजामास दरदरून घाम फुटला होता आपल्या समोर उभा असलेला गोसावी हा साधासुधा नसून कोणीतरी महान अवतारी महात्मा असावा. त्याने ताबडतोब महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले आणि क्षमा मागितली.

दुसऱ्या दिवशी मोठया आदराने महाराजांना दरबारात आणले व त्यांच्या मागण्याप्रमाणे नऊ चाहूर जमीन दान दिल्याची घोषणा केली. त्याच प्रमाणे निजामाने स्वखुशीने नारायण गड दैवतास नंदादीप व नैवेध यासाठी प्रतिदिन पाच रुपये देण्याविषयीचा ताम्रपट (तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली सनद) चार पितळी बिल्ले, आणि नरसू महाराजासाठी एक मेणा या वस्तू भेट म्हणून दिल्या तो मेणा आजही श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे पाहायला मिळतो.

निजाम सरकारने महादेव महाराजांना जे चार पितळी बिल्ले दिले त्यावर उर्दू व मराठी भाषेतून पुढील मजकूर कोरलेला आहे. “फसली सन १३०४चपरास संस्थान नारायण गड महंत तालुके पाटोदा जिल्हे बीड नं. १ या प्रमाणे मजकूर आहे.

नरसू महाराजानंतर शके १८०५ ईसवी सन १८८३ साली महादेव महाराज गडाच्या गादिवर बसले त्यांच्या वाणीतून बाहेर पडलेला कोणताही सब्द खोटा झाला नाही. साधना करीत असताना कधी कधी ते एक एक प्रहर म्हणजे तीन तीन तास पाण्यावर तरंगत रहात किंवा पाण्यात बुडी मारून सहजपणे रहात असत. त्यांच्या काळात त्यांनी उत्तरेकडील भिंती लगत काही वावऱ्या बांधल्या, नरसू महाराजांची समाधी बांधली, स्वयंभू महादेव मंदिरावरील शिखराचे काम सुरु होते, त्यावेळी मित्ती जेष्ठ व. (९) नवमी शके १८०७ इ. स. १८८५ साली त्यांनी आकस्मिकपणे देह ठेवला आणि ते पंचत्वात विलीन झाले.